Wednesday, February 28, 2018

गाथा खगोलशास्त्राची -१

खगोलशास्त्र .. आपल्या सभोवताल असणाऱ्या अथांग अमर्याद अवकाशाचा,त्यातील तारे ,ग्रह,तेजोमेघ,कृष्णविवर यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र.सभोवतालच्या घटनांचे  निरीक्षण करून काही निष्कर्ष काढणे हि माणसाची  प्रवृत्ती आहे . सूर्य,चंद्र,तारे ,ग्रह,धूमकेतू,उल्का ,तारकासमूह यांनी मानव भारावून गेला नसता  तर आश्चर्य होते . नैसर्गिक घटनांचे  कुतूहल आणि त्या मागील कार्य-कारण भाव समजून घेण्याची उर्मी यातून खगोलशास्त्रासह विज्ञानाच्या इतर शाखांचा उदय झाला.


खगोलशास्त्राचे आज असणारे ज्ञान काही एका रात्रीत मिळाले नाही ते हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचे फळ आहे.
खगोलशास्त्राची  उत्क्रांती चार टप्यात मांडता येईल. पहिले पर्व  म्हणजे थेट आदिकालापासून तर गॅलिलिओच्या काळा पर्यंतचा प्रदीर्घ  कालखंड.या काळात फक्त  डोळय़ांनीच अवकाश निरीक्षण करून अनुमान लावले गेले . सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओच्या रूपाने मानवाने  आकाशाकडे दुर्बीण रोखली  आणि खगोलशास्त्राला नवी दृष्टी मिळाली  हि   दुसऱ्या पर्वाची नांदी . दुर्बिणीतून निरीक्षण करून अनेक नव्या गोष्टी समोर आल्या . दुर्बिणीतून दिसणारे विश्व  खरेसे असले तरी पुरेसे नव्हते अठराव्या शतकात वर्णपटलीय  विश्लेषणातून नव्या गोष्टी उजेडात आल्या , हे तिसरे पर्व. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून  चौथ्या पर्वात खगोलशास्त्राचा प्रचंड वेगाने विकास झाला   वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींचा उदय याच काळातला .  १९६७ मध्ये चंद्रावर  पाऊल  ठेऊन मानवाने सीमोल्लंघन केले. आणि आज तर या प्रगतीचा वारू चौफेर उधळला आहे.



खगोलशास्त्र हि विज्ञानाची सर्वात जुनी शाखा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कारण अगदी आदिम अवस्थेत असल्यापासून माणूस आकाशाचे निरीक्षण करतो आहे. साधारण दीड लाख वर्षांपूर्वी दगडवर दगड घासून अग्नी चा शोध माणसाने लावून एका वैज्ञानिक युगाची सुरवात केली अस आपण  मानतो .परंतु याच्या आधी पासून माणसाला आकाशाचे कुतूहल असले पाहिजे किंबहुना आकाश निरीक्षण हि त्याची गरज असावी . कारण आकाशात एक मोठा तेजा चा गोळा असतो तो असे पर्यंत  शिकार वैगरे करून घ्या एकदा का तो गोळा नाहीसा झाला कि अंधारात हिंस्र  पशूंची भीती. त्यामुळे मानसणारे सूर्याच्या उदय अस्ता प्रमाणे आपले दैनंदिन व्यवहार बसवले असतील.



पुढे अग्नीचा शोध लागून काही अंशी स्थिरस्थावर झाल्यानंतर माणसाने रात्रीच्या आकाशाकडे नजर टाकली असेल.चांदण्यांनी गच्चं  भरलेलं आकाश पाहून आपले आदिम पूर्वज भारावून जात असतील. या ताऱ्यांचे त्यांना आकर्षण ,गूढ कधी कधी भीती सुद्धा वाटत असेल.अमूर्तामध्ये ओळखीचे आकार शोधणे हा मनुष्याचा स्वभाव आहे .यातून ताऱ्यांच्या विशिष्ट मांडणी मध्ये त्यांना सभोवतालचे प्राणी ,पक्षी ,झाडे दिसले असतील . पुढे पुढे या प्राण्याच्या ,पक्ष्यांच्या नावावरूनच त्यांनी आकाशातील ताऱ्यांच्या मांडणीला नाव द्यायला सुरवात केली असेल . हीच खगोलशास्त्राची प्राथमिक अवस्था.


अभिव्यक्त होणं हा माणसाचा फक्त स्वभाव नाही तर गरजही असल्याने माणसाने या त्याच्या खगोलीय कल्पनांची चित्रे काढली. फ्रांस जवळील लास्को( Lascaux)येथे एका गुहेत  उत्तर पुराष्मयुगीन  भित्तिचित्रे आढळलीआहेत . या चित्रात आदिमानवाने  मृग तारकासमूह ,वृषभ तारका समूह ,त्याचा बैलाचा काल्पनिक आकार , जवळ कृत्तिकेच्या ७ चांदण्या  अगदी ठळकपणे दाखवले आहे .हि चित्रे इ.स.पु १७,३०० इतकी जुनी आहेत.

पुढे नवाश्मयुगात माणसाने शेती करायला सुरवात केली. शेतीसाठी पावसाचा अंदाज ,ऋतूंचे चक्र हे समजून घेणे गरजेचे ठरले. या गरजेतून म्हणा किंवा उपजत असलेल्या  बुद्धिमत्तेतून म्हणा माणसाने निरीक्षणातून काही निष्कर्ष काढायला सुरवात केली. मुक एका तारकासमूहात सूर्य असताना अमुक ऋतू असतो किंवा पावसाची सुरवात या सारखी एखादी घटना घडते . हे माणसाच्या लक्षात आले.काही घटनांची  विशिष्ट कालावधी नंतर पुनरावृत्ती होते हे देखील मानवाच्या लक्षात आले.निरिक्षणीय खगोलशास्त्राची हि सुरवात होती . माणसाने आता अधिक जोमाने निरीक्षणे करून ठोकताळे बांधायला सुरवात केली . खगोलशास्त्राचे बाळ आता मान धरू लागले होते.

पुढे ताम्रपाषाणयुगात ,लोहयुगात सुद्धा खगोल शास्त्राचा विकास संथ गतीने होत राहिला.जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या संस्कृतींचा उदय झाला.आता फक्त पिकपाण्यासाठी नाही तर धार्मिक,सांस्कृतिक कारणांसाठी खगोलीय ज्ञानाची गरज वाटू लागली . विशिष्ट खगोलीय घटनांच्या वेळी विशिष्ट सणवार,उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली . सणवार,शेतसारा, पिकचक्र यासाठी कालगणनेची  गरज होती रोजचे दिवस-रात्र ,चंद्राच्या कला , सूर्याचे उत्तर-दक्षिणे कडे होणार प्रवास , विशिष्ट काळानंतर पुन्हा पुन्हा येणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून माणसाने  दिवस ,महिना ,वर्ष  हि कालमापनाची एकके निर्माण केली . आणि  इथे खगोलशास्त्राचे बाळ अधिक जोमाने रांगू लागले .

Tuesday, February 27, 2018

आकाशाशी जडले नाते ....

रात्रीच्या आकाशात अगदी सहज जरी पाहिलं तरी दिसतात असंख्य तारे! यांच्याच जोडीला आपल्या दिसतात भटके ग्रह, कापूस पिंजून ठेवल्या सारखे तेजोमेघ, द्राक्षाच्या  झुबक्या प्रमाणे काही तारकापुंज.मधेच एखादी चुकार उल्का चमकून जाते तर कधी धूमकेतू सारखे पाहुणे आपल्या भेटीला येतात.


चांदोबाला मामा म्हणणाऱ्या लहान मुलांपासून तर सहस्रचंद्रदर्शन  करणाऱ्या आजोबांपर्यंत सगळ्यांनाच या आकाशाच कुतूहल असते.

आज सिमेंटच्या जंगलात खिडकीतून आकाशाचा अगदी छोटासा  तुकडा आपल्या वाट्याला येतो .त्यात प्रकाशाचे बेसुमार प्रदूषण . या झगमगाटात चंद्राची कोर सुद्धा मोठ्या मुश्कीलने दिसते तर तारकासमूहांचे आकार , आपल्या आकाशगंगेचा पट्टा ,वसिष्ठ-अरुंधती सारखे जोडतारे ,मृगाचा तेजोमेघ ,कृत्तिके सारखे तारकापुंज हे सगळं दिसणं तर दुर्लभच झालंय.

 तरी सुद्धा आपल्या  सगळ्यांच्या  मनात एक आकाश असतं ! 
लहानपणी  मामाच्या गावी अंगणात झोप लागेपर्यंत  डोळ्यात साठवलेलं आकाश आजही मनात घर करून असतं .
आजी आजोबानी सांगितलेली ध्रुवबाळाची, नक्षत्रांच्या गोष्टी ,मामाने दाखवलेला ध्रुवतारा , त्याच्या भोवती  प्रदक्षिणा घालणारे सप्तर्षी ,अंधुकशी अरुंधती ,डमरू सारखं मृग,त्यात हरीण बसवण्यासाठी कल्पनाशक्तीला दिलेला ताण .जुन्या लोकांनी सांगितलेल्या धूमकेतूच्या आठवणी ......
हे सगळं आजही आठवणींच्या कुठल्याश्या कोपऱ्यात दडून बसले असते.


खरतर आपली संस्कृती सुद्धा या खगोलशास्त्राचा हात धरून जाते .बाळाचा  जन्म झाल्यावर त्याच नाव त्याच्या जन्मनक्षत्रावरून  ठेवतो . वास्तुशांतीच्या पूजेत ध्रुवताऱ्याची त्याच्या अढळपणामुळे प्रतीकात्मक पूजा केली जाते . लग्न झाल्या वर वधूवरांना सप्तर्षी  आणि ध्रुवतार्याचे  दर्शन घ्यायला लावतात .नवऱ्याने वसिष्ठ  दाखवायचा  आणि बायकोने त्याच्या शेजारची अंधुकशी  अरुंधती ओळखून दाखवायची.सगळे सणवार हे चंद्राच्या कलेवर आधारित. मकरसंक्रांती सारखा एखादा सण सूर्याचे राशीभ्रमण दाखवून देतो .त्यावरून आपल्याला कळते कि सूर्य दर महिन्याच्या  १४ तारखेला राशी बदलतो .तुम्ही  जर चतुर्थी करत असला तर  कळेल  कि कृष्ण पक्षात चंद्र रात्री उगवतो  तर शुक्ल पक्षात दिवसा .त्यात पण मे  महिन्यातल्या चतुर्थीला चंद्रोदय सगळ्यात उशिरा.पोटात भुकेने  ओरडणाऱ्या कावळ्यांमुळे हि गोष्ट आजही लक्षात आहे .रोजच्या पूजेत संकल्प सोडताना पंचांगाचा उल्लेख करावा लागतो . त्यातूनच रोजची तिथी,चंद्र,सूर्य ,गुरु हे कुठल्या राशीत आहे ?चंद्राची कुठली कला चालू आहे? हे रोजच्यारोज कळतं.कोजागिरी पौर्णिमे सारखा सण  टिपूर चांदण्यात फक्त जागायला नाही तर जगायला शिकवतो.


आणि म्हणूनच शहराच्या झगमगाटात आपण आकाशदर्शन विसरतोय कि काय असं वाटत असताना सुद्धा कधी  ट्रेकिंगच्या निमित्ताने ,तर कधी शहर पासून दूर प्रवास करताना अवचित निरभ्र नितळ आकाश दिसलं कि आपण थोड थांबतो.. तारकासमूहांचे आकार ओळखीचे वाटू लागतात.आठवणींचे पेटारे पुन्हा उघडली जातात . गोष्टी सांगणाऱ्या आज्जीचा आवाज कानात घुमायला लागतो.

"तो मृग कारे ?? .......हा सिंह असावा ... माझ्या मते हा तारा लुकलुकत नाहीये म्हणजे तो ग्रह असावा..

 गुरु का तो? ..... हे इथे  सप्तर्षी  म्हणजे ध्रुव तारा हा असा इथे असणार ....

माझ्या मामानी लहानपणी  शिकवलं  होत मला .... तुला ध्रुवबाळाची गोष्ट  माहितीये  का ? माझी आजी सांगायची मला ..माझी फेव्हरेट गोष्ट होती ती !!!!!"

हे असले संवाद सुरु होतात. लहानपणी डोळ्यात साठवलेलं आकाश पुन्हा मनाला व्यापून टाकतं ..

आणि आकाशाशी पुन्हा  नाते  जडते ...


माझ्याही मनात असच आकाश दडले होते ..खगोलमंडळात यायला लागल्या पासून  हे आकाश विस्तारायला लागले .तारे ,त्यांचा शास्त्रीय अभ्यास ,त्यांचे प्रकार  यांचा अभ्यास  सुरु झाला .वेगवेगळे तारका समूह ओळखता येऊ लागले  लहानपणापासूनच गोष्टीवेल्हाळ असल्यानाने या प्रत्येक तारकासमूहाच्या वेगवगळ्या संस्कृतीत असणाऱ्या गोष्टी ,दंतकथा  यात रमायला लागलो . त्याच सोबत त्यांची शास्त्रीय माहिती , अवकाशस्थ  वस्तू  यांचा अभ्यास सुरु झाला . रात्रभर जागून केलेली निरीक्षणे,सध्या डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तू दुर्बिणीतून पाहताना येणार आनंद.एक तास झुंझ देऊन दुर्बिणीतून स्वतः शोधात लावलेला एखादा ऑब्जेक्ट यातून आकाश अधिकच समजत गेले.


 या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीतून एक एक घास काढून हा ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न ..

 ऋग्वेदाच्या सातव्या मंडळाच्या २५ व्या सूक्तात एक  प्रार्थना केली आहे -"शं अन्तरिक्षं दृशये नो अस्तु |"
अंतरीक्ष आम्हाला अलौकिक दृश्य दाखवणारे आणि आमची दृष्टी बदलणारे ठरो !!! हा  ब्लॉग वाचताना तुमच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेलं आकाश सुद्धा पुन्हा मुक्त व्हावं आणि आकाशही पुन्हा नातं जडावं  हीच सदिच्छा !!!!!

गाथा खगोलशास्त्राची -१

खगोलशास्त्र .. आपल्या सभोवताल असणाऱ्या अथांग अमर्याद अवकाशाचा,त्यातील तारे ,ग्रह,तेजोमेघ,कृष्णविवर यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलश...